काही गोष्टी घडण्यासाठी निमीत्त लागतं हेच खरं …!
“उंच माझा झोका”. उंच म्हणजे आपल्याला वाटेल २०-२५ फूट. नाहीतरी ह्याच्या पेक्ष्या उंच झोके आपण पाहिले आहेत कुठे म्हणा ?????
झोका खेळायची मजा काही औरच असते नाही! मला अजूनही आठवत, शाळेत असताना उन्हाळी सुट्टी पडली की गावी २ महिने तरी मुक्काम ठरलेलाच. गावी गेलो की सर्वात पहिले काम काय असेल तर अगंणामधला झोपाळा बांधून घ्यायचा. तात्याकडून बैलांच्या ओंताचा एखादा दोर भांडून घ्यावा लागायचा. मांडवाला झोपाळा बांधायची खोटी की झोपाळ्यावरती पहिले कोण बसणार यावरून भांडणे सुरु व्हायची.
हे झाले बालपणीचे. पण मार्च पूर्वी मला कोणी सांगितले असते की तू ५०० फुटांचा लांबलचक झोका घेणार आहेस, अन तोही हजार फुट खोल दरीत झेपावत, तर मी त्याला नक्कीच वेड्यात काढले असते.
५ मार्च २०१३ … ! फेसबुक वर श्रीनिवास गोखले याने सहज एक अमेरिकेतील Grand Canyon मधील GIANT SWING चा VIDEO SHARE केला होता. Video अगदी थरारक होता. ह्या अशा साहसी Video वर अरुण सरांचे काहीना काही बोधपर Comments असतातच. त्यांच्या माहितीनुसार भारतामध्ये फक्त ऋषिकेश(उत्तराखंड) या ठिकाणी असे GIANT SWING केले जाते. पण तो Set-up पूर्णपणे Artificial असून तो New Zealand च्या तज्ञांनी उभारला असून तेच हाताळतात. तिथल्या सर्व गोष्टी मशीनीच्या सहाय्याने कार्यान्वित होतात. पण मित्रांनो, लवकरच तुम्हालाही असेच काहीतरी करायला मिळेल.
अन एका आठवड्याने अरुण सरांनी फेस बुकवर बॉम्ब टाकला. “आपल्याला असेच Grand Canyon सारखे Natural Set-up वर उभारलेले Giant Swing लवकरच करायचे आहे तेव्हा तयार रहा. जागा ठरलेली आहे. आपल्या सह्याद्रीतील ठिकाण आहे, तीन वर्षापूर्वीच मी पाहणी केलेली आहे. बस पुरेसे शिलेदार मिळाले की मोहिमेवर निघायचे. चार दिवसांची मोहीम असेल. कोण कोण येणार त्यांनी आत्ताच सांगा….!” झाले, लगेच शैलेंद्र आणि मी तयार झालो. अरुण सरांचा दुसरा प्रश्न… “पहिली उडी कोण मारणार ते सांगा”. शैलेंद्र म्हणाला “सर पाहिल्यांदा दगड टाकून बघूया”. श्रीनिवास म्हणाला “मी तयार आहे पहिल्या उडीसाठी”. मी पण उत्तर दिले “सर तुम्ही Set-up करणार असाल तर मला १०१ टक्के खात्री आहे की अपघाताची सुतरामही शक्यता नाही तेव्हा पहिली उडी मीच मारणार. पण सर Location तर कळू द्या”.
“हजार फुटांची खोल सांधण दरी ….!” अरुण सरांनी स्टेटस अप लोड केला. अन आम्ही पुरते हादरलो…!
सांधण दरी मी जवळून बघितली होती. अगदी दरीत उतरून तीच्या काळजाचा ठावही घेतला होता. माथ्यावरून खाली हजार दीड हजार फुट बघायलाच थरकाप उडतो, तर त्यात झेप कशी काय घेणार….! मला तर घामच फुटला. प्रथम मी उतरणार सांगून तोंडघाशी पडल्याची मला जाणीव झाली. हात दाखवून अवलक्षण म्हणतात ते हेच …!
१७ मार्च ला Giant Swing च्या जागेची पाहणी करण्यासाठी अरुणसर, प्रकाशसर, जयंतकाका, श्रीनिवास व जयंता भंडारदरा परिसरातील सांधण दरीत जावून थडकले. जमिनीत पाचशे फुट खोल व दोन किलोमीटर लांब पसरलेला अजस्त्र चर. सह्याद्रीतील एकमेव आश्चर्य. साधारण ५/६ वर्षांपूर्वी अरुणसर सर्वप्रथम ही दरी उतरून गेले होते. त्यानंतर इथे त्यांनी Rappelling व Valley Crossing चेही कॅम्प ही घेतले. त्यामुळे त्यांना या दरीची खडान खडा माहिती होती. पण Giant Swing साठी वेगळ्या पद्धतीने पाहणी करणे गरजेचे होते.
दुसऱ्या दिवशी उत्कंठेने मी अरुण सारांना फोन केला.
“या घटकेला आपली मोहीम ९९% यशस्वी झालीय हे मी आत्ताच सांगून टाकतो”. सरांच्या बोलण्यात विश्वास ठासून भरला होता. मी खुश झालो. चला आपल्याला काहीतरी नवीन खाद्य मिळणार तर ….!
मोहिमेची तारीख निश्चित झाली. १२-१३-१४ एप्रिल २०१३. ११ ला रात्री ९ च्या सुमारास आम्ही एकूण १३ जण मुंबईहून निघालो ३ बाईक व दोन कार कसाऱ्याच्या दिशेने सुसाट निघाल्या. अरुण सरांच्या कारमध्ये दोर वगैरे एवढे सामान भरले होते की मागची सीट छतापर्यंत भरली होती. प्रकाश सरांची गाडी माणसांनी भरली होती. आम्ही आमच्या बाईकवर सवार होतो. रात्री २ वाजता आम्ही सामरथ गावात यशवंतच्या घरापाशी पोहोचलो. आमच्या आधी पुण्यावरून गिरीश व सागर येऊन पोहोचले होते व मस्तपैकी खळ्यात पथारी पसरवून झोपले होते. आम्हीही आमच्या स्लीपिंग ब्याग काढल्या …!
पहाटे बरोबर ५ वाजता माझ्या मोबाईलच्या विचित्र आवाजाने सगळेजण धडपडून जागे झाले. एक अफलातून रिंगटोन मी मोबाईल मध्ये टाकला आहे. तो ऐकल्यावर आजारी माणूसही धडपडून उठून बसतो. चहा नास्ता उरकल्यावर आम्ही गाडीतले साहित्य भराभर बाहेर काढले व बाईकवर चढवायला सुरुवात केली. सांधणला ज्या ठिकाणी आमचा बेस कॅम्प होता तिथे आता फक्त बाईकच जाऊ शकणार होती. महिन्याभरापूर्वी केलेल्या पाहणीत तिथे फक्त बैल गाडी जाते असे कळले होते. बाईक नेण्याचा प्रयोग आम्ही प्रथमच करणार होतो. जर का तो अयशस्वी झाला तर मात्र आम्हाला बऱ्यापैकी लोड फेरी करावी लागली असती अन चांगला अर्धा दिवस फुकट गेला असता.
ऐकूण पाच बाईक दोर, क्याराबीनर, पुली, हार्नेस आदी अनेक साहित्याने व रेशनिंगच्या सामानाने लगडलेल्या होत्या. सर्वात प्रथम गिरीश बर्वेची बुलेट होती. त्याचे मागे पराग येवले, सागर अमराळे, सागर दळवी व निखिल वैद्य सज्ज झाले.
आमचा निरोप घेऊन ते गावाला वळसा मारून बैल गाडीच्या वाटेने निघाले. आमची पायवाट जवळची होती. तरीही पाऊण एक तास लागणारच होता. उरलेले सामान पाठीवर मारून आम्हीही निघालो.
वीसेक मिनिटात सांधणच्या मुखापाशी पोहोचलो. मुखाशी कातळातून अतिशय स्वच्छ व रुचकर पाणी वाहत असते. सोबतचे पाच लिटरचे क्यान व वाटर बॉटल भरून घेतल्या
आणि पैलतीरी जावून उजव्या अंगाला वळसा घेत सांधण दरी जिथून कोकणात झेप घेते त्या टोकापाशी पोहोचलो. उजव्या अंगाला सांधण दरीचे हजार फुटांचे कातळकडे तर डाव्या अंगाला रतनगडालगतचे घनदाट जंगल पसरले होते. जंगलालगत असलेल्या मोठ्या डेरेदार वृक्षाखाली बेस कॅम्प प्रस्थापित केला. पुढील तीन दिवस इथेच आमचा मुक्काम असणार होता. बाजूला एके ठिकाणी दोरांचा व साहित्याचा ढीग पडला होता.
म्हणजे आमच्या बाईक इथपर्यंत पोहोचल्या होत्या तर. आम्ही सुटकेचा निश्वास टाकला..….! नाहीतर आम्हाला गावातून सामान आणायची हमाली करायला लागली असती. बाईकवाले दुसरी लोड फेरी करायला गेले होते.
नितीन, जयंतकाका व युवराज सरांनी बेस कॅम्पचा ताबा घेतला. कारण तेच बेस कॅम्पचे प्रमुख होते. ताडपत्री अंथरून एका बाजूला जेवणाचे साहित्य व दुसऱ्या अंगाला गिर्यारोहणाची साधने अलग केली गेली. तोपर्यंत अरुणसर व मी मिळून दोन चुली तयार केल्या. इतरांनी जंगलातून वाळलेल्या काटक्या गोळा करून आणल्या.
अरुण सरांनी सगळ्यांना एकत्र बसविले अन मोहिमेची सविस्तर माहिती दिली. या मोहिमेची कल्पना अरुण सरांची होती. पाहणी करून आल्यावर प्रकाशसरांना सोबत घेऊन त्यांनी या मोहिमीचे नियोजन केले. “भारतात अशा प्रकारची ही पहिलीच मोहीम असल्याकारणाने आपल्याला प्रत्येक पाऊल उचलताना दहा वेळा विचार करावा लागणार आहे. नाहीतर अपघात होऊ शकतो हे नीट ध्यानात ठेवा. मला वा प्रकाश सरांना विचारल्याशिवाय कोणताही निर्णय घ्यायचा नाही हे लक्षात असू द्या” अरुण सरांनी सगळ्यांना निक्षून सांगितले.
मग आम्ही सर्वजण सांधण दरीच्या दिशेने निघालो. मी सर्वांच्या पुढे होतो. कारण अजूनपर्यंततरी पलीकडील अंगाने मी सांधण दरी बघितली नव्हती. त्यामुळे माझी उत्कंठा अगदी शिगेला पोहोचली होती. अन काही क्षणातच त्या विराट दरीचे आम्हाला थरार दर्शन झाले.
कोकणात उतरलेल्या या दरीचा दोन हजार फुटांचा थेट तळही दिसत होता. तो भयानक drop बघितल्यावर मात्र माझी बोबडीच वळली. माझ्या डोळ्यासमोर दिवसाच तारे चमकायला लागले.
“काय मग अजूनही पहिली उडी मारायचा निर्धार कायम आहे ना? की मी मारू पहिली उडी, बोल” अरुण सरांनी माझा अंदाज घेतला. “सर तुम्ही रोप फिक्सिंग करणार आहात त्यामुळे मला कसलीच चिंता नाही” मी सरांना सांगून टाकले.
दरीच्या दोन किनारींच्या भिंतीमधील अंतर साधारण दिडशे ते पावणे दोनशे फूट असावे. प्रकाशसर, सागर व मी दरीच्या पलीकडील अंगाला एक नायलॉनची सुतळ घेऊन गेलो. त्याच्या एका टोकाला दगड बांधून मी व प्रकाश सरांनी पलीकडे भिरकावला पण दगड काही पोहोचला नाही
मग खास ठेवणीतला माणूस सागर दळवी पुढे सरसावला. त्याने दोन चार वेळा प्रयत्न केल्यावर सुदैवाने दगड पैलतीरी गेला. पण माथ्यावर न जाता वीस फुट खाली उभ्या कातळात एका भेगेत जाऊन अडकला. अरुण सरांनी लगेच दुसरा दोर दरीत सोडून त्यावरून ऱ्यापलिंग करून कातळात अडकलेला दोर सहीसलामत वर आणला. येताना ते जुमारिंग करून वर आले.
या सुतळीला २ मिलीमीटर जाडीचा दोर बांधण्यात आला. तो हळू हळू आम्ही खेचून घेतला. कारण जर का सुतळ तुटली असती तर मग ती परत फेकायला लागली असती अन ते एवढे सोप्पे नव्हते. २ मिलीमीटर ६ मिलीमीटर जाडीचा दोर बांधला. तोही आम्ही खेचून घेतला
चला… आता आमचे टेन्शन गेले. ६ मिलीमीटर जाडीच्या दोराने आम्ही कितीही वजन खेचू शकणार होतो.
पलिकडे योगेश माने व कपिल पिळणकरने १२ मिमी जाडीचे तीन दोर एकत्र करून झोक्याचा आडवा मुख्य दोर तयार करून ठेवला होता. खरं तर तीन टन क्षमता असलेला १२ मिमी जाडीचा एकाच दोर उडी मारणाऱ्याचा झटका घ्यायला व वजन पेलवायला पुरेसा होता. पण अरुण सरांनी कुठलीही रिस्क घ्यायची नाही असे ठरविले होते. मुख्य दोराच्या मध्यभागी १० टन क्षमतेचे पोलादी कडे बांधण्यात आले.
त्यातून १० मिलीमीटर जाडीचे दोन सुरक्षा दोर ओवाण्यात आले. उडी मारणाऱ्याच्या हार्नेसला हे दोर अडकविले जाणार होते. इथेही खरं तर एकच दोर पुरेसा झाला असता. पण पहिलाच प्रयोग होता म्हणून जास्तीची सुरक्षा घेण्यात आली होती. मुख्य दोर ६ मिलीमीटरच्या दोराला बांधण्यात आला. आम्ही तो हळू हळू आमच्याकडे खेचून घेतला व चार मजबूत झाडांच्या खोडांभोवती वळसा घालून प्रकाश सरांच्या देखरेखेखाली मजबूत बांधून टाकला.
पलिकडील दोराचे दुसरे टोकही पुर्णपणे ताणून झाडांना बांधण्यात आले. या दोरापासून साधारण अडीचशे फुटांवर दरीच्या टोकाला पुढे आलेल्या एका मोठ्या शिळेपाशी सुरक्षा दोर खेचून आणण्यात आले. तो आमचा उडी घेण्याचा टेक ऑफ पॉईन्ट असणार होता.
याच शिळेवरुन ठरल्याप्रमाणे प्रथम एक मोठाला धोंडा बांधून सोडण्यात येणार होता. तो प्रयोग यशस्वी झाला की मग माझा बळी देण्यात येणार होता. त्या खोल दरीत बघून बघून हळू हळू माझे अवसान ढळू लागले होते.….!
“सर अडीच वाजायला आलेत. मजबून भूक लागली आहे. जेवून घेवूया का?” मी वॉकी-टोकि वरून हळूच अरुण सरांचे लक्ष दुसरीकडे वळवायचा प्रयत्न केला. “अरे बापरे, चला लवकर जेवून घेऊया” सर म्हणाले. मला जरा हायसे वाटले.
आम्ही दरीला वळसा घालून बेस कॅम्पला येईपर्यंत नितीन व युवराज सरांनी जेवणाची ताटे सजविली. प्रत्येकाने घरून आणलेल्या जेवणाची देवाण घेवाण झाली.
मला मात्र आज जेवण रुचकर लागत नव्हते …!
जेवणे उरकल्यावर आम्ही मोठाल्या दगडाच्या शोधात निघलो. जंगलात अरुण सरांना हवा तसा दगड सापडला. “सर, जर का दोराने हा दगड पेलवला तर मग सागरला सोडायला हरकत नाही” मी म्हणालो. ‘वेट लिफ्टर’ सागर माझ्याकडे रागाने बघत होता. एका मोठाल्या ओंडक्याला बांधून आम्ही तो दगड टेक ऑफ पॉईन्टपाशी नेऊन ठेवला.
अरुण व प्रकाश सरांनी त्या दगडाला सुरक्षा दोर करकचून बांधले. सुरक्षा दोर समोरील आडव्या मुख्य दोराच्या मध्यभागी ओवलेल्या पोलादी कड्यातून दुसरीकडे एका झाडाला बांधलेल्या दोन डिसेण्डरमधून ओवण्यात आला होता. नितीन व परागवर त्या दोराच्या नियंत्रणाची जबाबदारी सोपविली होती. दगड दरीत सोडल्यावर त्याला परत वर घेता यावे म्हणून १० मिलीमीटर जाडीचा व ६०० फुट लांबीचा अजून एक दोर दगडाला बांधण्यात आला. श्रीनिवास व्हिडिओ शुटींग करणार होता तर सागर अमराळे व सागर दळवी आपापले कॅमेरे घेऊन सज्ज होते. दोराला कड्यावरून लोटायची जबाबदारी सरांनी माझ्यावर व यशवंतावर सोपविली होती. प्रत्येकाने आपापली पोझिशन घेतली होती.
आमच्यासाठी भाकरी आणताना गावातील यशवंताने एव्हाना आमच्या या जगावेगळ्या साहसाची बातमी गावात पसरविली होती. त्यामुळे पैलतीरी गावातील बरीच मंडळी आमचा हा अचरटपणा बघायला आली होती. होय, त्यांच्यामते असे काहीतरी अचाट करणे म्हणजे मूर्खपणाच असतो. हेही खरे की जर का तुम्ही त्यात यशस्वी झालात तर मग हेच गाववाले तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील.
अन तो ऐतीहासिक क्षण जवळ आला. मी व यशवंताने त्या दगडाला शिळेच्या टोकावर आणून ठेवले. मी माझ्या कमरेच्या हर्नेसला सुरक्षा दोर बांधून पायाने तो दगड लोटायला खाली बसलो.
सर्वांनी श्वास रोखून धरले. अरुण सरांनी १, २, ३ म्हटले अन मी जोर काढून त्या दगडाला सांधणच्या खोल दरीत लोटून दिले. सूऊऊऊ आवाज करीत दगडाने दरीच्या पोकळीचा ठाव घेतला. एक भला मोठ्ठा झोका घेत तो सुसाट गेला. दूर जाताना त्याचे आकारमान कमी कमी होत गेले. तो येवढा दूर गेला की अगदी छोट्या गोट्याएवढाच दिसू लागला.
दगडाने थोडा थोडका नव्हे तर पाचशे फुटांचा झोका घेतला होता. तिथून परत येताना मात्र त्याचे आकारमान पूर्ववत झाले. आम्ही सर्वांनी आनंदाने टाळ्या वाजविल्या. मोहीम फत्ते झाल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होता. “शिवाजी महाराज की जय । जय भवानी जय शिवाजी” च्या आरोळ्यांनी सारी दरी दुमदुमून गेली. पलीकडील गावकऱ्याननीही आनंदाने आरोळ्या ठोकल्या.
बरेच झोके घेतल्यावर दगड अधांतरी स्थिर झाला. त्याखाली साधारण पाचसहाशे फुटांवर दरीचा तळ होता. दोराला लटकत असलेल्या दगडाला पाहिल्यावर मला ऐकून परिस्थितीची जाणीव झाली आणि काळजातून भीतीची लकेर उमटून गेली. भीती वाटणे हा मनुष्य स्वभाव झाला. पण त्यावर मात करणे आपल्याच हातात आहे. मनातून मी आतापर्यंत केलेल्या साहसी मोहिमांच्या आठवणींची जमवाजमव करायला सुरुवात केली. शेवटी मीच मला धीर द्यायला हवा नाही का …!
दगडाला बांधलेल्या ६०० फुटांच्या दोराचे दुसरे टोक आमच्या हातात होते. त्याने तो ८०/९० किलोचा दगड वर खेचायचा होता. त्यासाठी शंभर फुटांवर एकूण चार बाईक घेऊन बाईकस्वार तयार होते. गिरीश वैद्यच्या एकट्या बुलेटचे धूडच हा दगड ओढायला काफी होता. अन त्याने साधारण पन्नास फुटांचे अंतर खेचलेही. आम्ही सार्वजण खुष झालो. चला… आपली मोहीम १००% यशस्वी झालीय. अगदी सुरळीत पार पडतेय.
पण आमच्या चेहऱ्यावरील आनंद फार काळ टिकला नाही. पन्नास फुटांनंतर मात्र बुलेट पुढेच सरकेना. जणू काही कर्णाच्या रथाप्रमाणे धरतीमातेने बुलेटचे चाक धरूनच ठेवले असावे. मग तीन बाईकच्या मागील बाजूस एक आडवा ओंडका बांधून त्याला दोर बांधला. शिवाय आम्हीही दोर खेचायला लागलो
दगड दरीच्या किनारीपासून अगदी तींसेक फुटांवर आला अन सर्वांचीच ताकद संपली. लगेच नितीन सरांनी जुमाराने दोर लॉक केला. म्हणजे दगड परत दरीकडे जाणार नव्हता.
काय करावे सुचेना. दोर जमिनीवरून जात असल्याकारणाने घर्षणामुळे आपल्याला जास्त ताकद लागत असल्याचे अरुण सरांच्या लक्षात आले. “सध्या कुठल्याही परिस्थितीत दगड वर खेचून घेऊया. मग उद्या हा प्रोब्लेम मी सॉल्व्ह करतो. डोन्ट वरी” सरांचा चाळीस वर्षांचा अनुभव बोलू लागला.
प्रकाश सरांनी लगेच झेड पुलीची सिस्टीम तयार केली अन हळू हळू आम्ही तो दगड खेचून वर आणला. प्रकाश सरांमुळे मला पुलीची सिस्टीम शिकायला मिळाली. खरंच पुलीमुळे मानवाचे काम किती सुलभ झाले आहे याची मला जाणीव झाली. या प्रणालीचा शोध लावणाऱ्या माणसांचे मी मनोमन आभार मानले.
इतका वेळ आमची ही गम्मत पाहत आकाशात असलेल्या सुर्यदेवानेही सुटकेचा निश्वास सोडला अन उद्या परत भेटण्याचे आश्वासन देऊन तोही क्षितिजाआड दिसेनासा झाला …!
एव्हाना अंधार पडायला सुरुवात झाली होती. अरुण सरांनी आजचे काम थांबवायचे ठरविले. आम्ही बेस कॅम्पला परतलो. दोघेजण पाणी आणण्यासाठी बाइक घेऊन रवाना झाले. ही एक गोष्ट आमच्यासाठी सुखाची होती. बाईकवरून आम्हाला पाणी आणता येत होते. अरुण सरांच्या हातचा फक्कड चहा ढोसला अन जीवाला थोडी शांती मिळाली. म्हटलं आता थोडी विश्रांती घ्यावी. म्हणून आम्ही काहीजणं हळूच ताडपत्री च्या कोपरयापाशी सरकलो. पण सरांना आमच्या मनातील कळले असावे. “चला झोपताय काय. कामाला लागा. बघा मी बसलो आहे का. लगेच जेवण बनवायला सुरुवात देखील केली. प्रकाश सर आता तुमची नॉट प्रक्टिस घेतील अन दोर गुंडाळायच्या वेगवेगळ्या पद्धती शिकवीतील. नो विश्रांती.…!” आमच्या स्वप्नांचा क्षणात चुराडा झाला.
प्रकाश सर छान शिकवितात. त्यांनी आमच्याकडून चांगला सराव करून घेतला. तोपर्यंत अरुण सरांनी नितीन व युवराज काकांच्या मदतीने जेवण बनविले. भाकरी, भाजी, भात, कढी, लोणचे, पापड असा साग्रसंगीत बेत होता. मजा आली …!
जेवणानंतर दुसरे दिवशीची उजळणी झाली. जेवण बनवता बनवता अरुण सरांनी गिर्यारोहकाला दरीतून लीलया वर खेचण्याचा तोडगा शोधून काढला होता. त्याप्रमाणे कामाची विभागणी करण्यात आली. मुंबईहून रात्री अजून पाच जणांची टीम येऊन मिळणार होती. त्यामुळे आमची तुकडी मजबूत होणार होती. नितीन सरांनी आभाळातल्या ग्रह ताऱ्यांची आम्हाला सविस्तर माहिती दिली. आमच्यासारख्या नवोदितांना ती पर्वणीच होती. आकाश निरीक्षणानंतर आम्ही झोपी गेलो.
पहाटे तीन वाजता राजसाहेब (राज बाकरे) आपल्या सोबत्यांसह टोर्चच्या उजेडात बेस कॅम्पवर डेरेदाखल झाले. त्यांनीही आमच्याशेजारी पथारी पसरली.
नेहमीप्रमाणे माझ्या मोबाईलच्या कर्कश्य आवाजाने सर्वजण उठून बसले.
सरांनी चहासाठी आधण ठेवले. आज कांदे-पोह्यांचा बेत होता. अशा जंगलात लिंबू पिळून, त्यावर ओल्या नारळाचा कीस शिवरून कांदे पोहे खायला मिळणे म्हणजे माझ्यासाठी पर्वणीच होती.
नस्ता आटोपला अन सर्वजण यंत्राप्रमाणे कामाला लागले. राजासारखा अनुभवी गिर्यारोहक मिळाल्यावर आमचाही हुरूप वाढला होता. काल परतताना टेक ऑफ पॉईण्टच्या जवळ कातळात नैसर्गिक खोलवर पडलेली एक भेग अरुण सरांनी बघून ठेवली होती. त्यात दोन फुटांचे अंतर राखून सात फुटांचे दोन ओंडके पाचरी सारखे खुपसले. ‘वेट लिफ्टर’ सागर दळवी शिवाय हे काम कोणालाच जमले नसते. सुमुख व निलेश जाधव यांनी त्याचे आजूबाजूला छोटे छोटे दगड भरून ती भेग बुजवून टाकली.
साधारण सहा फुटांवर आडवी काठी बांधून त्याला पुली लाटकविण्यात आली. त्यापासून वरचे अंगाला असलेल्या झाडाच्या टोकावरही अजून एक पुली बांधण्यात आली.
तिथून पुढे पन्नास फुटांवर असलेल्या झाडाला तिसरी पुली अडकविली. वर खेचण्याचा दोर सर्व पुलीतून ओवण्यात आला. त्याचे शेवटाले टोक बुलेटला बांधून खेचण्यात येणार होते.
“काल होत असलेले घर्षण पुलींमुळे बाद झाले आहे. आता आपल्याला दोर लीलया खेचता येईल बघा. चला सुरज साहेब. मारणार ना पहिली उडी. काय, काल रात्री झोप लागली का? चेहऱ्यावरून कळतंय सारं. फुकटची शायनिंग मारत होता. आता मलाच पहिली उडी मारावी लागणार” अरुण सरांनी मला डिवचले.
“सर ही दरी तशी भयानकच आहे. बघितल्यावर भल्या भल्यांची बोबडी वळणार हे निश्चित. उडी मारताना भीती वाटणे साहजिक आहे. पण मी माघार नक्कीच घेणार नाही. मला खात्री आहे की मला काहीही होणार नाही. कारण माझा तुमच्यावर व तुम्ही उभारलेल्या या सेटअप वर पूर्ण विश्वास आहे. मीच मारणार पहिली उडी. लॉक किया जाय” एका दमात एवढी वाक्ये बोलून मी मोकळा झालो. “दयाटस अ स्पिरीट, दयाटस अ कॉन्फिडन्स” अरुण सरांनी मला शाबासकी दिली.
मी तयार झालो. प्रकाश सरांनी मला हार्नेस चढविली. त्याला क्याराबीनर अडकविण्यात आले. एक छोटी स्लिंग पोटाला वळसा घालून तीही क्याराबीनर मध्ये फसविण्यात आली. झटक्याने हार्नेस तुटली तरी मी या स्लिंगवर लटकलो असतो. दरीत इमर्जन्सी उतरायला लागले तर डिसेंडर व जुमारही मी बरोबर घेतले होते. राजने डोक्यावर हेल्मेट चढविले. मुख्य सुरक्षा दोर हार्नेसच्या क्याराबीनरला अडकविण्यात आले.
त्यांचे दुसरे टोक डिसेंडर मधून ओवून नितीन, पराग व अभिषेक वैद्य सांभाळणार होते. माझ्या शेजारी उभी राहून शीतल फोटोग्राफी करणार होती. “सुरज घाबरल्यासारखा दिसतोयस रे… तुला जमणार नाही हे सगळे… चल हार्नेस काढ तुझी. मीच जाते आता तुझ्या ऐवजी” शीतल मला डिवचत होती.
ज्या शिळेवरुन मला उडी घ्यायची होती त्याचे माथ्यावर मी माझे पाय घट्ट रोवले.
उडी मारताना मनी एकच इच्छा होती. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपति शिवरायांच्या नावाचा जयघोष करीत उडी घ्यायची. अरुण सरांनी मला ग्रीन सिग्नल दिला अन शिवाजी महाराजकी जय म्हणत मी त्या खोल दरीत स्वत:ला झोकून दिले.
क्षणभर काय झाले ते मला कळलेच नाही. माझे शरीर वाऱ्याला कापत खोल दरीत फेकले गेले अन पुढच्या क्षणातच मी एक मोठ्ठाला झोका घेत आजोबाच्या डोंगराच्या दिशेला भिराकावला गेलो. काही क्षणानंतर मी आकाशाच्या दिशेने उंच उंच भरारी घेतली. अन त्याच वेगाने परत मी बेस कॅम्पच्या दिशेला दुसरा झोका घेतला. आनंदातीशयाने आपोआप माझ्या तोंडून आरोळी निघाली “जय शिवाजी जय भवानी”. सांधण दरीत माझी ललकारी बराच वेळ मला ऐकू येत होती.….!
एका मागोमाग एक असे अनेक झोके घेत हळू हळू मी दोराला लटकत स्थिर झालो. आयुष्यात प्रथमच एवढे मोठे झोके घेताना खूप मजा येत होती. पण थोडी भीतीही वाटत होती. मला अगदी हायसे वाटले. मी जिवंत आहे तर …! सहज खाली वाकून बघितले तर सांधणचा तळ बऱ्यापैकी खोल दिसत होता. असे अधांतरी लटकायलाही डेरिंग हवी याची जाणीव झाली.
सरांनी इशारा केला अन गिरीशने आपली बुलेट सुरु केली. त्याने अगदी लीलया मला वर खेचून घेतले.
पुली सिस्टीमने आपले काम चोख पार पाडले होते. सरांचे प्लानिंग अगदी परफेक्ट असते. दरीच्या किनारी येताना खूपच गम्मत वाटत होती. मी वर आल्यावर राजने मला आनंदाने मिठी मारली. सर्वांनी माझे अभिनंदन केले. अरुण सरांची शाब्बासकीची थाप पाठीवर पडली अन जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटले. आयुष्यात काहीतरी केल्याचा आनंद झाला. अशा प्रकारच्या नैसर्गिक सेटअप वरून उडी मारणारा भारतातील मी पहिला गिर्यारोहक ठरलो होतो. आज मी खुश होतो … अतिशय खुश होतो….!
माझ्यानंतर एका हातात व्हिडीओ कॅमेरा घेऊन श्रीनिवास गोखले यानेही भन्नाट झेप घेतली.
आनंदाने त्याचेही तोंडून आरोळी बाहेर पडली. आमचे हे कवतिक बघायला अख्खा सामरथ गाव लोटला होता. त्यांच्या मते ते एक आक्रितच होते.
श्रीनिवास वर आल्यावर आम्ही थोडी विश्रांती घ्यायची ठरविली व जेवणानंतर इतरांनाही झोके घेण्याची संधी मिळणार होती. तिकडे प्रकाश व अरुण सरांची काहीतरी चर्चा सुरु होती. प्रकाश सरांच्या मते टेक-ऑफचे ठिकाण थोडेसे रिस्की होते. एखाद्याने उडी बरोबर घेतली नाही तर त्याला खरचटण्याची भीती होती. प्रकाश सरांच्या डोक्यात गिर्यारोहकाला सोडण्याची एक वेगळीच पद्धत घोळत होती. त्याप्रमाणे दोघांनी मिळून एक जागा निश्चित केली.
जेवण उरकल्यावर आता प्रकाश सर जायला तयार झाले.
त्यांना त्यांच्या पद्धतीने जायचे होते. त्यांची पद्धत सर्वांनाच आवडली अन प्रत्येकाने सरांचाच मार्ग अवलंबिला.
त्यादिवशी व दुसरे दिवशी मिळून एकूण एकोणीस जणांनी सांधण दरीत उंच झोके घेतले.
प्रत्येकाची व्हिडीओ शुटींग काढण्यात आली. राजची उडी मात्र खास होती. सागर दळवीनेही दरीत छान झेप घेतली.
साठी उलटलेल्या युवराज काकांनी, पन्नाशी उलटलेल्या नितीन व जयंत काकांनीही या अनोख्या साहसाचा अनुभव घेतला.
अरुण सरांची तर गोष्टच वेगळी होती. त्यांना कोशात भीती नावाची गोष्टच नसावी. त्यांनी तर व्हिडीओ शुटींग काढण्यासाठी दोनदा झेप घेतली. गावातील बाया-बापड्या, पोरे-टोरे अगदी म्हातारे-कोतारेही आमचे हे साहस बघायला आले होते.
आम्ही सर्वांनी यशस्वीरीत्या “उंच माझा झोका” GIANT SWING हे भारतामध्ये यशस्वी करून दाखविले. हा संपूर्ण संघाचा विजय होता. त्याचबरोबर अरुणसर आणि प्रकाशसर यांनी केलेल्या परीश्रामचे फळ होते.
दुपारनंतर दोर काढायला सुरुवात झाली. सरांनी त्याचेही नियोजन करून ठेवले होते. मी, प्रकाशसर व सागर दोर सोडवायला पलीकडे रवाना झालो. अवघ्या दोन तासातच सर्व दोर काढले गेले.
सांधण दरी मोकळी झाली. आम्ही भराभर साहित्य आमच्या दुचाकींना बांधायला सुरुवात केली.
साधारण चार वाजता आमची वरात सामरथ गावात पोहोचलो.
दुचाकीवरील साहित्य चार चाकींमध्ये कोंबण्यात आले. यशवंताच्या बायकोच्या हाताचा फक्कड चहा पिउन आमच्या गाड्या मुंबईच्या दिशेने रवाना झाल्या. गिरीश बर्वे व सागर अमराळे त्यांच्या बाईक घेऊन पुण्याच्या दिशेने निघाले.
आज माझ्या जीवनातील परमोच्च आनंदाचा दिवस होता. मला मनोमन खूप खूप आनंद होत होता. रात्री अगदी छान झोप लागणार होती एवढे खरे. त्या तीन मंतरलेल्या दिवसांची आठवण काढीत अरुण सरांच्या गाडीत मला केव्हा झोप लागली कळले देखील नाही….!