Lonavala to Khandas via Bhimashankar SOLO

लोभी शब्द कानावर पडता लगेच स्वार्थी माणूस नजरेसमोर येतो पण आम्हा भटक्यांसाठी लोभी म्हणजे ” लोणावळा ते भीमाशंकर “

एखाद्या गोष्टीचा लोभ करणे म्हणजे काय, जर का माहित नसेल तर तुम्ही लोणावळा ते भीमाशंकर हा ट्रेक नक्की करून बघा ते पण फक्त भाद्रपद ( सप्टेंबर ) महिन्यात. माझी गिर्यारोहणाची सुरवात २०११ वर्ष्यापासुन झाली आणि पाहिल्यावर्षीच हा ट्रेक करण्याचं भाग्य माझ्या नशिबी आल. २०११ या एका वर्षात खूप ठिकाणी भटकंती झाली पण राहून राहून लोभीची आठवण काही जाता जात नव्हती शेवटी पुन्हा एकदा लोभी ट्रेक करायचा ठरवलं. 

२०११ पासून जे काही ट्रेक केले त्यामध्ये एक गोष्ट पक्की झाली ती म्हणजे ट्रेकला ७ ते ८ जणांची टोळी म्हणजे एकदम मस्त combination होत. २०१२ मध्ये काही मित्रांना ट्रेकचे निमंत्रण देखील दिले होते पण मराठीत एक म्हण आहे “नकटीच्या लग्नाला १७६० विघ्ने” अगदी तसंच काहीतरी चालू होत. एकामागोमाग एक करत सर्वच मला टांग देऊन गेले, मी तर आत्ता जणू काही निर्धारच केल्यासारखा वागत होतो. कदाचित नियतीला देखील मी सर्वांबरोबर जाणे मान्य नसेल, पण माझा ट्रेक अगदी सुरळीतपणे पार पडला. पहिल्यादा एकट्याने लांब पल्ल्याचा ट्रेक पूर्ण केला होता. त्यानंतर बऱ्याच वेळा मित्रानंबरोबर लोणावळा ते भीमाशंकर हा ट्रेक केला. 
२०१६ मध्ये अरुण सर देखील लोभी ट्रेकला आले. तेव्हा आमचं लोभी एकदिवसीय मोहिमेवर बोलणं झाले. ३१ डिसेंबर २०१७ रोजी अरुण सर त्याच्या ऑफिसमधून निवृत्त झाले आणि लगेच १ ते २ दिवसात लोभी एकदिवसीय मोहिमेचे बिगुल वाजवून तारिख ठरवली. सरांचा एकाच गोष्टीवर सर्वात जास्त जोर होता ते म्हणजे पूर्णपणे सराव करून कोणतीही गोष्ट केली तरच तुम्ही मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण करू शकता. २४ फेब्रुवारी २०१८ रोजी मोहीम करायचा निर्धार पक्का झाला. सरावासाठी ५० दिवस हे तसे पुरेसे होते पण काही दिवसाच्या तयारी नंतर सर्वजण आपापला अनुभव ग्रुपवर मांडत होते त्यामध्ये सरांच्या अनुभवाचा पुरेपूर फायदा आम्हा सर्व नवीन मंडळींना झाला. 

२४ फेब्रुवारी २०१८ च्या रात्री  ठीक १ वाजता ISOLATION ZONE च्या २६ मावळ्यांनी लोणावळा रेल्वे स्टेशनच्या इंडिकेटर खालून या TRAIL RUN ला सुरवात केली. आम्ही २६ जण एकूण तीन ग्रुप मध्ये विभागले गेलो होतो. पहिल्या तुकडीची जबाबदारी अरुण सरांनी माझ्या अंगावर सोपिवली होती. दुसऱ्या तुकडीचे नेतृत्व संजय शेळके तर तिसऱ्या तुकडीचे  नेतृत्व आमचा Back Lead Expert सागर अमराळेकडे होती. 

सकाळी ७ च्या सुमारास सर्व टीम कुसूर गावात पोहोचून कोस्लो सॅन्डविच खाऊन पुढचा टप्पा तळपेवाडी गाठण्यासाठी तयार झाली.  कुसूर ते तळपेवाडी हा या trail run मधला सर्वात महत्वाचा टप्पा  होता. सर्वात पुढे मी, अरुण सर, रुचेश पाखरे ,अंबरीश गुरव, यतीन सावंत व  गर्ग थेट भीमाशंकर मंदिर गाठले तेव्हा दुपारचे ४ वाजून ९ मिनटं ( १५ तास ९ मिनिट ) झाले होते. २५ ते ३० मिनिट आराम करून शिडी घाटानी खाली उतरायला सुरवात केली. खांडस गावाच्या काठेवाडी मध्ये संध्याकाळी ७ वाजून १६ मिनीटाला थडकून, अरुण सर, रुचेश, मयांक  आणि मी आम्ही चौघांनी मिळून एक नवीन विक्रम प्रस्थापित केला ( १८ तास १६ मिनिटात लोणावळा ते भीमाशंकर ते खांडस ) 

संजयच्या टीमला भीमाशंकरला पोचायला १७ तास ३० मिनिट तर सागरची टीमला भीमाशंकरला पोचायला १९ तास १५ मिनिट लागली, या २६ जणांमध्ये फक्त विद्या डिसुझा या एकाच महिलेचा समावेश होता. याप्रकारे सरांच्या मार्गदर्शनाखाली आमची हि मोहीम पूर्णपणे यशस्वी झाली होती.

एक trail run करून थांबेल तो गिर्यारोहक कसला! पुन्हा अरुण सर आणि मी आम्ही दोघेजण trail run साठी तयार झालो. 
“सुरज, खरं तर ही माझ्या डोक्यात आलेली कल्पना, अन मीच करायचे ठरविले होते. पण आतापर्यंत मी बरेंच काही केले आहे. अगदी तृप्त आहे. तेव्हा ही संधी मी तुला देत आहे” सरांचे शब्द माझ्या कानावर आले अन मी पुरता गोंधळूनच गेलो. कुठली कल्पना? मला काहीच कळेना. सर म्हणाले “हे बघ, लोणावळा ते भीमाशंकर ते खांडस सोलो करायचा मी ठरविले होते. पण माझ्यापेक्षा कमी वेळेचा रेकॉर्ड तू प्रस्थापित करशील याची मला खात्री आहे. तेव्हा दोन तीन दिवस धावण्याचा सराव कर. या शनिवारी फाल्गुन पौर्णिमेला, धुलिवंद आहे. तो दिवस सार्थकी लागला पाहिजे.”अन मी पेटून उठलो…..सरांनी माझ्याबाबतीत जो विश्वास दाखविला तो सार्थ ठरवायचा. मी त्यांना म्हंटले “मी आत्ताच जायला तयार आहे तुम्ही फक्त आपल्या टीमला विचारून परवानगी द्या”. 
होळीच्या दिवशी दुपारी कामशेतमध्ये एक मीटिंग केली व रात्रीच जेवण लवकर करून लोणावळा रेल्वे स्टेशनला ११ वाजता पोचलो. थोडी झोप काढीन म्हंटलं पण मच्छरचा इरादा काही औरच होता. दिनांक २ मार्च २०१८ रोजी रात्री १:३० च्या अखेरीस मोबाईल खणखणला. अरुण सरांच्या भाषेमध्ये माझा मोबाइल वाजला म्हणजे मुडदा पण जागा होईल, पण मी पुन्हा झोपून जातो कारण मला त्या आवाजाची सवय झाली आहे. आजचा दिवस थोडा वेगळा होता कारण या ट्रेकला कुणी साथीदार नव्हता, तोंडावर पाणी मारून  २-३ बिस्किटे खाल्ली,अर्धा लिटर पाणी प्यायलो 

माझ्या बॅग मध्ये २ सफरचंद, २ उकडलेली अंडी, २ electrol  चे packets राहिलेला पार्लेजी आणि १ लिटर पाणी होते. २ वाजता लोणावळा रेल्वे स्टेशनच्या घड्याळाखाली फोटो काढला आणि हर हर महादेवाचं नाव घेऊन ( घोषणा देऊन ) SOLO  LOBHI ONE DAY MOUNTAIN TRAIL RUN  करायला सुरुवात केली. रेल्वे स्टेशन ते तुंगार्ली गावापर्यंत इच्छा असूनही कुत्र्याच्या भीतीमुळे धावता आले नाही. रात्री २:३० वाजता गावच्या हद्दीत प्रवेश केला तर गावकरी होळीच्या बाजूला बसून गप्पा मारत होते त्यात एकांनी न राहून विचारले “एकटा कुठे जातोयस रं ?” मी सांगितले “भीमाशंकरला जात आहे” त्यावर त्यो म्हणाला “आरं बाबा, येवढ्या रातचा तुला रास्ता ठावं हाय का अंधाराचा ?” मी  हो हो करत दुसरा गियर टाकला. पळत पळतच वाळवंड गावामध्ये रात्री ३ वाजून ४० मिनीटाला पोहचलो तिथे माझ्या स्वागतासाठी कुत्र्याची फलटण तैनातच होती, याच्या पुढे पायवाट चालू होणार व नकळत धावण्याचा वेग कमी होणार कारण याआधी देखील एकटा या गावापर्यंत आलो होतो पण याच्या पुढे अंधारात कधीच गेलो नव्हतो. 
यापुढे मला थोडी फार भीती वाटत होती पण माझ्या सोबतिला पौर्णिमेचा चंद्र म्हणजे सुरजला चंद्राची साथ होती. सकाळी ४:३० वाजता जांभिवली गावातून येणारी व कोंडेश्वर मंदिराकडून येणाऱ्या वाटेवर पोहचलो. याच्या पुढचा टप्पा सर्वात जास्त घाबरगुंडी उडवणारा होता कारण कुसूर पठारावर जवळपास वस्ती नाहीच फक्त एकाच धनगर मामाच घर आहे ते पण एकदम कोपऱ्यात. कुसूर पठाराच्या दिशने मी आगेकूच केली बरोबर ५ वाजता कुसूर पठाराच्या सपाटीवर पोचलो. काही पक्ष्याचा किलबिलाट चालू झाला तेव्हा कुठे माझ्या जीवात जीव आला.

५ :४० ला धनगरमामांना आवाज देऊन पुढे निघालो. ६ वाजेपर्यंत कुसूर गाव गाठायचा ठरवलं पण कुसुर गावात पोहचायला ६:१५ वाजले. पहिला फोन सागर अमराळेला करून सर्वांना मी कुसरमध्ये सुखरूप पोहचलो हे कळविले आणि दुसरा फोन अरुण सरांना करून मी १२ वाजेपर्यंत भीमाशंकरला पोहचणार असा अंदाज देऊन ठेवला. अंधाराच साम्राज्य संपुन प्रकाशाच्या साम्राज्याची सुरवात होणार म्हणजे खुद्द सूर्यदेवाची कृपा त्यात हा १६ किलोमीटर डांबरी रस्ता ( कुसूर ते खांडी ते सावळे ते तळपेवाडी ) म्हणजे शरीराची चांगलाच कस  काढणार फायदा फक्त एवढाच होता कि भुंगाट पळता येईल पण त्या भुंगाट पाळण्याच्या नादात कधी माझी हॅट पडली हे मला समजले देखील नाही बरं झालं मी अजून २ टोप्या घेऊन गेलो होतो .

sack मधून एक सफरचंद खात चाललो होतो. खांडीमध्ये ७ वाजता पोहचलो तेव्हा आपण विचार केलेला त्यापेक्षा थोडे मागे आहे असे सतत जाणवत होते. ७:४७ ला सावळे गाव गाठले. 
९ वाजता काही झाले तरी पढरवाडी वरून ट्रेक चालू केला तरच मी १२ वाजता भीमाशंकरला पोहचू शकतो हा माझा अंदाज होता. तळपेवाडीला ८:२१ ला पोहचून गप्प ५ मिनिट बसलो एक उकडलेलं अंड खाल्ल आणि थोडं पाणी पिऊन पुन्हा एकदा धावायला सुरुवात केली . वांद्रे खिडीमधून संजयला फोन करून निरोप सांगितला पण पढरवाडी गाठता गाठता मला ९:३२ झाले आता शेवटचा ५ मिनिट आराम करून जेवढे पाणी घेता येईल तेवढे सर्व भरून घेतले कारण याच्या पुढे थेट भीमाशंकरलाच पाणी मिळणार हे माहित होत. 

हि तंगडतोड चालूच होती कमळजाई मंदिराच्या दिशेने चालत होतो पण उन्हामुळे डोकं एकदम तापून गेलं होत. सकाळी रस्त्यावर धावत असताना HAT कधी पडली हे समजलंच नाही त्याचा दणका मला आत्ता थोडा फार जाणवायला सुरवात झाली. १०:३० च्या आसपास खूप भूक लागली तेव्हा मी  चिक्की खाल्ली तरी पोटातले कावळे काही ऐकायचं नाव घेईना शेवटी नाइलाजामुळे पुन्हा एकदा थांबून शेवटचं उकडलेलं अंड खावं लागलं. यामध्ये माझी महत्वाची ५  मिनिट गेलीत पण पोटात काही नसेल तर पुढे जाऊन अजून काही झालं तर कोणीच नाही.” precautions is better than cure ”  कमळजाई मंदिराजवळ 11:38 ला पोहचलो पुन्हा एकदा संजयला फोन करून ४५ मिनिटांमध्ये मी भीमाशंकर मंदिर गाठतोय तर संजय म्हणाला “अरे लेका तू तर अर्ध्या तासातच पोचशील”. मी रात्री पासून फक्त १५ मिनिट आराम केला होता त्यामुळे हे जरा शक्य वाटत नव्हते तरी मी खूप प्रयन्त केला परंतु ४८ मिनिट लागलीच.
भीमाशंकरला मंदिराचा कळस लांबूनच दिसला आणि जीवात जीव आला. १२:२६ला मी मंदिराजवळ काही फोटो काढून लिंबू पाणी पिऊन ५ मिनिट आराम केला. 

लोणावळा ते भीमाशंकर ट्रेक तर खूप सोपा आहे पण शिडी घाट सर्वात जास्त अवघड आहे. गिर्यारोहण किंवा प्रस्तरारोहणामध्ये जे काही अपघात होतात ते जास्तीच जास्त माणूस थकल्यामुळे झालेले आहेत असं आत्तापर्यंतच्या माझ्या वाचनात आले आहे म्हणून मी १२:३६ ला निघायचा निर्णय घेतला लांबूनच महादेवाला नमस्कार करून शिडी घाटाने खाली उतरायला सुरवात केली. १३:३० वाजता गणेशघाट आणि शिडीघाटाच्या सपाटीवरती पोहचून शिडीघाटाने खाली उतरायला सुरुवात केली. शिडी घाटामधून खाली उतरण तस्स नक्कीच सोपं नाही. नजर हट्टी तो दुर्घटना घटी अशी परिस्तिथी याची पुरेपूर कल्पना होती त्या सावधगिरीनेच खाली उतरलो. जेव्हा शिड्या संपून खाली आलो तेव्हा मात्र पुन्हा धावणं चालू करून थेट गाडी पर्यंत खांडस काठीवाडीला १४:१६ ला पोहोचलो.
माझ्या विक्रमाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी खास मुंबई मधून अरुण सर, राजेश पाखरे, रोहन मालुसरे (भाऊ) आले होते, या सर्वाना बघुन आलेला थकवा क्षणात नाहीसा झाला. 

लोणावळा ते भीमाशंकर हे  59 किमी चे अंतर 10 तास 26 मिनिटात एकट्याने (SOLO ) पार करून एक नवीन विक्रम प्रस्थापित केला तसेच 
लोणावळा ते भीमाशंकर ते खांडस हे ६२ किमी चे अंतर १२ तास १६ मिनिटात एकट्याने (SOLO ) पार करून गिर्यारोहण क्षेत्रात एक नवीन विक्रम प्रस्थापित केला ….!