माळशेज घाट म्हटला की हरिश्चंद्र आणि त्याचा अजस्त्र कोकणकडा आठवणार नाही असा कोणी गिर्यारोहक नसावा. माझ्या माहितीप्रमाणे हरिश्चंद्रगडावर जाण्यासाठी तश्या तीन ते चार न्हवे तर तब्बल चौदा वाटा आहेत. त्याची माहिती खाली देत आहे. इथे लिहताना मी माझ्या माहिती प्रमाणे सर्वात सोपी वाट पहिली आणि सर्वात कठीण वाट शेवटी या क्रमाने लिहीत आहे. त्यात कदचित कुठेतरी एखादी वाट वरती खाली असू शकते. यातील मी स्वतः जवळ जवळ बारा वाटा वरती भटकंती केली आहे.
१) पाचनई
२) खिरेश्वर
३) लव्हाळी
४) होळ्याची वाट
५) वेताळ धार
६) गणेश सोंड
७) जुन्नर दरवाजा
८) बैल घाट
९) शाबरीचा उतारा ( प्रस्तरारोहण करता येणाऱ्यांसाठी )
१०) नळीची वाट ( प्रस्तरारोहण करता येणाऱ्यांसाठी )
११) साधले घाट – बैल घाट किंवा नळीची वाट
१२) माकड नाळ ( प्रस्तरारोहण करता येणाऱ्यांसाठी )
१३) रोहिदासची नाळ ( प्रस्तरारोहण करता येणाऱ्यांसाठी )
१४) तारामतीची नाळ ( प्रसारारोहण करता येणाऱ्यांसाठी )
साहसवीरांसाठी अजून एका नवीन पण अवघड नळीचा शोध घेता येईल असे अरुण सावंत सरांना वाटत होते. माळशेज घाटाच्या पायथ्याला थीतबी गाव आहे. थेट थीतबीतून तारामती आणि बालेकिल्ल्याच्या मधल्या बेचक्यात तळापासून वरपर्यंत एक घळ (नळी) जाते. या नळीची उंचीही जबरदस्त आहे. जवळ जवळ साडेतीन हजार फुट. या नळीत आजतागायत कोणीही शिरले नव्हते. जर का या नळीतून हरिश्चंद्र गडावरती जायला नवीन वाट बनवता आली तर महाराष्ट्रातील ती सर्वात उंच नळी ठरेल असे अरुण सरांना जाणवले
काही दिवसांनंतर अरुण सरांचा मला मोबाईल वर संदेश आला. आपल्याला नवीन नळी चढायची आहे, जी कदाचित सह्याद्री मधली सर्वात उंच नळी असेल “विशेष म्हणजे ती नळी कोणत्याही प्रस्तरोहण साधनाशिवाय चढू शकु. तयार रहा. २५,२६,२७ फेब्रुवारी या तारखा निश्चित झाल्या आहेत.पण त्या वेळी माझा नेमका राजमाचीचा प्लान ठरला होता. ते पण शाळेमधल्या मित्रांबरोबर. तब्बल ७ ते ८ वर्ष नंतर सर्वजण एकत्र भेटणार होते. त्यामुळे मी अरुण सरांना माझा नकार कळविला. ह्या वर्षामधल्या अरुण सरांनी पार पडलेल्या बहुतेक सर्वच शोध मोहिमेत माझा सहभाग होता. पण ही मोहीम त्याला अपवाद ठरणार होती.
त्यानंतर अरुण सरांचा मला मोबाईलवर संदेश आला की आम्ही ती घळ यशस्वीरीत्या ओपन केली. रूट जबरदस्त आहे. ओपन करायला दोन दिवस लागले.
फेबुवारी महिना सुरु झाला होता. काय माहिती पण मला खूपच कंटाळा आला होता. मी घरी सांगून टाकले की या महिन्यात मी कुठेच ट्रेकिंगला जाणार नाही. फक्त गोरेगावच्या नंदादीप विद्यालयातील वॉलवर सकाळचा प्रस्तरोहण सराव करायचा ठरविले. त्याप्रमाणे शनिवारी सकाळी वॉलवर गेलो होतो. आज अरुणसर पण आले होते. इकडच्या तिकडच्या गप्पा चालू होत्या. अन हळूच त्यांनी एक भन्नाट प्लान माझ्या समोर ठेवला. “नुकतीच आम्ही ओपन केलेली तारामतीची घळ एका दिवसातच मारायची…. एका दिवसात साडेतीन हजार फुट चढाई करायची. मार्च मध्ये मला वेळ मिळणार नाही. जायचेच असेल तर उद्याचाच दिवस आहे.तू जर का नवीन नळी ने गेलास तर तु हमखास जी जुनी नळी आहे ती विसरशील व तुझ्या मित्रांना पण ह्याच फायदा होईल. तुला टाईम आहे का???”.
मी थोडा गांगरूनच गेलो. माझा कंटाळा क्षणात नाहीसा झाला. जी घळ ओपन करण्यासाठी अरुण सरांना दोन दिवस लागले तीच घळ अवघ्या एका दिवसात करायची म्हणजे माझ्यासारख्याला lottery लागल्या सारखेच होते. असा मुहूर्त शोधून मिळणार मिळणार नाही. मी एका पायावरती तयार झालो.शनिवारी ९ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी माझ्या बाईकने निघायचे ठरले. पण सुरक्षेसाठी दोघांपेक्षा तीन-चार जण असावेत असे सर म्हणाले. तिथूनच आम्ही प्रसाद सामंत आणि कुणाल भावे यांना फोन लावला व मोहिमेची कल्पना दिली. तेही एका पायावर तयार झाले. अशी सुवर्ण संधी कोण बरे सोडेल…! शनिवारी ९ फेब्रुवारी २०१३ ला दुपारी २:३० च्या सुमारास अरुणसर आणि मी माझ्या दुचाकी वरुन मुंबईहून निघालो. थितबीला ६:३० वाजता पोहोचलो. दुसरे दिवशी हरिश्चंद्र गडावरून उतरल्यावर सोयीचे पडावे म्हणून माझी बाइक घाटावरील खिरेश्वर गावामध्ये ठेवायचे ठरले. साबळे मामाच्या मुलाने त्याची बाइक घेतली व मी माझी. खिरेश्वरला माझी बाइक एका हॉटेलपाशी ठेवली व साबळे मामाच्या मुलाच्या बाइकवरून परत थितबीला परतलो. तोपर्यंत एसटी ने प्रसाद व कुणालही आले होते. रात्रीचे जेवण करून आम्ही साबळे मामांच्या अंगणातच पथारी पसरली.सकाळी ४:४५ वाजता माझ्या मोबईलचा विचित्र अलार्म वाजू लागला अन आमच्यासकट घरातले सगळेच घाबरून जागे झाले. खास गिर्यारोहणासाठी मी तो अलार्म राखून ठेवला आहे. रात्रीच आम्ही आमच्या स्याक भरून ठेवल्या होत्या. नेहमीप्रमाणे GPS सेट केला. पहाटे ५:२० वाजता चालायला सुरवात केली. अजूनही सर्वत्र अंधार पसरला होता. त्यात शेजारील माळशेज घाटामधल्या वाहनांचा उजेड लक्ष्य वेधून घेत होता. सध्या आम्ही मानवी GPS (अरुण सर) च्या आधारे काळू नदीच्या धबधब्याच्या दिशेने चालत होतो. अरुणसर या खोऱ्यात १९८७ पासून येत असल्याकारणाने त्यांना हा परिसर खडानखडा माहिती होता.६:३० चा सुमारास आम्ही तारामतीच्या मुख्य नळीमध्ये शिरलो. माझ्या पोटात एव्हाना कावळे ओरडायला लागले होते. ‘सर काहीतरी खाऊया आपण’ मी सरांना सांगितले. सरांनी लगेच नदीतल्या काटक्या जमवून मस्त चहा बनवला. चहा व टोस्टवर आम्ही आडवा ताव मारला.
नास्ता करून पुढे निघालो. प्रसादच्या मते आपण दुपारी १ च्या आत नळी पूर्ण करायचीच. त्यासाठी वाटेत कुठेही थांबायचे नाही. हळू हळू अंधाराचे साम्राज्य संपून उजेडाचे साम्राज्य सुरु झाले. ७:२८ ला पहिला अवघड Traverse लागला.
डाव्या भिंतीच्या कडेने साधारण १०० फुट उंचीवरून तिरक्या दिशेने वर सरकणाऱ्या या वाटेवर बहुतेक ठिकाणी ठिसूळ माती होती. सावधतेनेच पावले टाकावी लागत होती. अर्ध्या तासाने दुसरा Traverse लागला. पहिल्या Traverse च्या सख्खा भावासारखाच पण हा जास्त अवघड होता. खाली दीडशे फुटांचा drop होता. आम्ही चारही जण तसे सराईत होतो. पण खालचा drop बघितल्यावर मला जरा भीतीच वाटत होती. मागच्या वेळेला अरुण सरांनी traverse च्या सुरुवातीला सुरक्षेसाठी Expansion Bolt मारला होता. त्याचा यावेळी फायदा झाला. त्यात क्याराबीनर व दोर फसवून अरुण सर पुढे सरसावले.
Traverse संपल्यावर एक झाडाच्या खोडाला त्यांनी दोर बांधला. त्यानंतर प्रसाद सामंत मागोमाग कुणाल भावे आणि त्याच्या मागे मी अश्या प्रकारे चौघांनीही अवघ्या अर्ध्या तासातच त्याच्यावर मात केली.तिथून खाली नदीच्या पात्रात गेल्या वेळी टाकलेला मुक्काम अरुण सरांनी खालच्या बाजूला दाखवला. त्याकडे नजर टाकून आम्ही झपाट्याने पुढे सरकलो.एव्हाना सकाळचे ९:२७ वाजले होते अवघ्या ४ तासामध्ये आम्ही नळीचा अर्धा टप्पा ओलांडला होता. १५ ते २० मिनीटातच आपण पाण्याच्या ठिकाणी पोहोचणार आहोत अशी गोड बातमी अरुण सरांनी दिली. कारण डिसेंबर नंतर सह्याद्रीत सगळीकडेच पाण्याचे दुर्भिक्ष असते. गिर्यारोहकांचे चढाईपेक्षा पाण्याविनाच जास्त हाल होतात. ९:५२ वाजता पहिले पाणी लागले.
या ठिकाणी आम्ही अंड्याची भुर्जी व भाकरी खाऊन पाणी भरून घेतलं. ५ मिनटात दुसरा पाण्याचा साठा लागला. यानंतर आपल्याला शेवटपर्यंत कुठेही पाणी मिळणार नाही तेव्हा आता आपल्याला पाण्याचे रेशनींग करावे लागणार आहे याचे सर्वांनी भान ठेवावे. अरुण सरांनी आम्हाला सावध केले.
चिंचोळी नळी आता चांगलीच रुंद झाली होती. दहा फुटांचा मोठाला खडक चढून वर आलो अन डोळ्यांचे पारणेच फिटले. डाव्या अंगाने उतरणारी बालेकील्ल्याची नळी आणि उजव्या अंगाने उतरणारी जुन्नर दरवाजाची नळी आमच्या पायापाशी एकत्र येवून मिळत होत्या. बालेकील्ल्याची नळी तर अगदी हत्तीच्या सोंडेसारखी सरळसोट खाली उतरतांना दिसत होती.
“सर without equipment ही नळी चढता येईल असे वाटत नाही” प्रसादचा प्रश्न. ‘अरे १५ दिवसांपूर्वीच तर आम्ही हा वरचा patch without equipment चढून गेलो. दुरून डोंगर साजिरे हे सुभाषित आपल्या बाबतीत नेमके उलटे आहे एवढे लक्षात ठेव” अरुण सरांनी प्रसादला समजाविले.
सकाळचे १०:२९ वाजले होते. ५ तास चालत होतो तरी फक्त दीड हजार फूट उंचीच गाठली होती. खरी नळी तर आत्ता चालू झाली, १५-२० फुटांचे छोटे-छोटे पण सरळसोट कातळ चालू झाले. त्यावर पाठीवरील sack घेऊन चढणे जिकरीचे होते. अशा वेळी प्रसाद व कुणाल प्रथम वर चढत व मग साखळी पद्धतीने आमच्या पाठपिशव्या खेचून घेत. त्यानंतर आम्ही चढत असू. माझ्यासारखा नवीन गिर्यारोहकाला अशा प्रकारचे प्रस्तरोहण करायला मिळणे ही फार भाग्याची गोष्ट होती. वाटेत एके ठिकाणी तर भल्यामोठ्या शिळेने आमचा मार्गाच बंद करून टाकला. पण गम्मत अशी की त्या शिळेच्या बुंध्यातूनच उंबराचे एक झाड उगवले होते. खास आमच्यासाठीच ते उगवले असावे.
त्यावर कसरत करून चढण्याची मज्जा काही वेगळीच होती.
साधारण साडे अकरा वाजता आम्ही शेंडी सुळक्याच्या समपातळीवरील उंची गाठली अन थोडेसे हाय वाटले. मागे वळून बघितले. ज्या नळी मधून वरती आलो त्याच्या आजूबाजूचा परिसर मोहक दिसत होता. दुरवर पसरलेले कोकण, माळशेज घाट, त्याच्या डावीकडील पठारावरील एमटीडीसी, पुढे खुबी गाव अन त्यासमोरील अफाट पसरलेला पिंपळगाव धरणाचा पाण्याचा साठा, सारेच कसे मनाला प्रसन्न करीत होते. पाण्याच्या साठ्याकडे बघून मनाला एक शंका स्पर्शून गेली “या वर्षी पडलेल्या दुष्काळामध्ये ह्या पाण्याचा उपयोग आजूबाजूच्या गावकऱ्यांची तहान भागवण्यासाठी होणार की नाही …!” .
आता अंदाजे ५०० फुटांची नळी बाकी होती. पण चढ अगदी सरळ असल्यामुळे खूप वेळ लागणार हे निश्चित होते. एके ठिकाणी तर साधारण १०० फुटांची नळी एवढी उभार होती की अगदी सावधतेने चढावे लागत होते. कारण कोणाच्या पायाने चुकून एखादा दगड निसटला तर खालाच्याच्या डोक्यातच आदळला असता.
“आपल्याला दुपारी १ वाजताच नळी संपवायची आहे” हा प्रसादचा अंदाज बहुतेक खरा ठरेल असे वाटत होते. प्रसाद अन कुणाल बरोबर मी पुढे सरसावलो. १२:३० वाजता आम्ही नळीच्या शेवटाला येवून पोहोचलो.
शेवटचा सत्तर फुटांचा scree चा patch चढून जाण्याची संधी मला मिळाली. मी एकदम खुश झालो. “घाई करू नकोस. जेवढा सोपा वाटतो तेवढा हा रूट सोप्पा नाहीय. सावकाश जा” अरुण सरांचे अनुभवाचे बोल कानी पडले अन सावध झालो. सावकाश वर चाडलो अन दोन झाडांना मिळून दोर बांधला व खाली सोडला. पाठोपाठ प्रसाद, अरुणसर व कुणाल वरती आले. तेव्हा दुपारचे १२:५० झाले होते.
सह्याद्री मधली सर्वात उंच ३३२३ फुटांची तारामती-बालेकिल्ल्याची नळी अवघ्या ७:३० तासामध्ये चढण्याची कामगिरी पार पाडली. आम्हाला खूप खूप आनंद झाला. ह्या पावसाळ्यानंतर साहसी गिर्यारोहकांसाठी हरिश्चंद्र गडावरती जाण्यासाठी अजून एक नवीन नळी तयार झाली. कोकण काड्याच्या नळीच्या वाटेची जागा आता ही नळी घेइल यात काहीच शंका नाही. मला अरुण सरांचे बोलणे आठवले तेव्हा मी नवीन नळीच्या प्रेमात पडलो होतो. जर का तुम्ही ह्या नळीतून हरिश्चंद्र गाठला तर तुम्ही देखील जुनी नळी विसराल. यावेळी गेल्या वर्षी मी अरुणसर व सिद्धार्थ वराडकर या तिघांनी अवघ्या साडेनऊ तासात पूर्ण केलेल्या “अलंग, मदन, कुलंग” ट्रेकची प्रकर्षाने आठवण झाली.